सुमारे दहा वर्षांपूर्वी मला एका पुण्याच्या ग्रुपबरोबर कंबोडियामध्ये अंगकोर (अंग्कोर) वाट येथे जाण्याचा योग आला. आमच्या ग्रुपला मार्गदर्शक म्हणून डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू तसेच इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर सर होते हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. देगलुरकरांची Temple Architecture and Sculpture of Maharashtra, प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती, मंदिर कसे पहावे?, वेरूळ दर्शन अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्याकडून या सर्व परिसराची माहिती ऐकणे हा एक अद्भुत अनुभव होता.
कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटके यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते 1860. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!
समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.
अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!
खरं तरं, अविश्वसनीय!
त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेच काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती!
हे एक मंदिर होते.
नाव होते, 'अंग्कोर वाट'!
एक मंदिर!
भारतापासून 5000 किलोमीटर दुर देशातील एक हिंदू मंदिर!
आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे प्रार्थना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही. एवढे अवाढव्य प्रार्थनास्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!
एका कंबोडियन हिंदू सम्राटाने हे बांधले होते 12 व्या शतकात! इसवी सन 1150 च्या सुमारास! मात्र, 15 व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती.
500 एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' मंदिर आहे, भगवान विष्णूचे!
पश्चिममूखी असलेले हे मंदिर किती भव्य असावे? मुख्य प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला तीन ते चार किलोमीटर चालावे लागते! मंदिराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी 5.5 किलोमीटर आहे! 4 मीटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे 250 मीटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, मंदिरात नाही!
पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य मंदिराजवळ येतो!
तत्कालीन कंबोडियन हिंदू राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य मंदिर घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या सात आश्चर्यांपैकी मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल!
'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला 150 ते 200 वर्षे लागली, काहींना 300! दुसऱ्या सुर्यवर्मनने हे मंदिर घडवले ते फक्त 30 ते 35 वर्षात. लाखो कंबोडियन नागरिक, कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या मंदिरासाठी अविरत झटतं होते!
ही वास्तू पुर्ण करण्यासाठी 48 लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास उपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दूर असलेल्या महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास 80 ते 90 किलोमीटर होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणणे, हे किती कर्मकठीण काम असेल याचा फक्त विचार करून बघा.
दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारा पैसा होता पण नव्हता तो फक्त वेळ! त्याला त्याच्या जीवनकालात हे मंदिर पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे उभारले! सारेचं अवाढव्य!
डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य!
या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम!
आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.
एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता उपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!
अशा तीन गॅलरीज लांबलचक गॅलरीज आहेत, ज्यांनी संपूर्ण मंदिराला विळखा घातलायं. 250 मीटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दीड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या उंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य मंदिराची सुरुवात!
या सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक उंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर मंदिराचे आभाळात घुसलेले पाच कळस.. एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले चार कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची उंची 233 मीटर आहे! म्हणजेच 70 ते 80 मजली उंच इमारती एवढी!
जेव्हा हे मंदिर पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती 30000, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख! युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर! बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!
(हे भरभराटीला आलेले शहर, मंदिर पुढच्या दोन-तीनशे वर्षांत, ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल)
आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या मंदिराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते!
या गॅलरीजमध्ये अडीच मीटर उंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तीचित्रे आहेत! पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि दुसऱ्या सुर्यवर्मनची कारकिर्द दगडात कोरली आहे!
मंदिरात जवळपास 1500 अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या सारख्या वाटल्या तर जरा निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा!
अविश्वसनीय आणि अतर्क्य! ही सगळी भित्तीचित्रे बघायची म्हटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं! हे सारे कोरीव काम दगडी भिंतीवर तीन ते चार इंच खोलीत! हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची. मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू!
भित्तीचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच, तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परतं सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची!
असे अवाढव्य मंदिर बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात आणने, हे सारेचं अफलातून! असे म्हणतात की या मंदिराच्या उभारण्याच्या कामी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता. धन्य ती सारीचं मंडळी!
हे असले काही भव्यदिव्य पाहिले की हात आपोआप जोडल्या जातात. भारतीयांच्या तत्कालीन स्थापत्यज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो आणि आपण किती महान संस्कृतीत जन्माला आलोयं, याची जाणीव होते!
आयुष्यात एकदा तरी जगातील प्रत्येक माणसाने, निदान प्रत्येक भारतीयाने आवर्जून बघावे असे हे अंग्कोर वाट जगातील एक आश्चर्य आणि स्थापत्यशास्त्राचा एक अविश्वसनीय नमुना आहे.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
प्रेरणा: रवी वाळेकर यांचा लेख