एखादे चांगले काम साध्य करण्याच्या उद्देशाने केलेली कृती जेव्हा इच्छित परिणामाच्या बरोब्बर विरुद्ध आणि विपरीत परिणाम साधते तेव्हा त्याला कोब्रा इफेक्ट म्हणतात.
ही गोष्ट अशी आहे:
ही गोष्ट आहे ब्रिटिशकालीन भारताची. दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. नागरिक भीतीच्या छायेखाली जगत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक साप मारून बक्षिसे मिळवू लागले आणि ही योजना यशस्वी ठरली असे वाटू लागले. पण लवकरच अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मेलेल्या सापांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.
चौकशीअंती एक धक्कादायक सत्य समोर आले. बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी पैसे कमावण्यासाठी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली होती. ते घरातच साप पाळायचे, त्यांना मारायचे आणि सरकारकडून बक्षीस घ्यायचे. जेव्हा सरकारला हा घोटाळा कळला, तेव्हा त्यांनी तातडीने ही बक्षीस योजना बंद केली. पण आता एक नवीन आणि अधिक गंभीर समस्या निर्माण झाली होती. ज्या लोकांनी साप पाळले होते, त्यांच्यासाठी ते आता निरुपयोगी झाले होते. त्यांनी ते सर्व साप सोडून दिले. परिणामी, शहरात पूर्वीपेक्षाही जास्त नागांचा सुळसुळाट झाला. ज्या उपायाने समस्या सुटायला हवी होती, त्याच उपायाने समस्येला अधिक बिकट बनवले. इतिहासातील ही प्रसिद्ध घटना "कोब्रा इफेक्ट" म्हणून ओळखली जाते.
"कोब्रा इफेक्ट" म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या समस्येवर विचारपूर्वक तयार केलेला उपाय अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम देतो, ज्यामुळे मूळ समस्या अधिकच गंभीर बनते. असे निर्णय अनेकदा घेतले जातात, जे वरवर पाहता खूप प्रभावी वाटतात, पण प्रत्यक्षात ते नुकसानकारक ठरतात. याचे कारण म्हणजे निर्णय घेताना मानवी स्वभाव, लोकांची प्रतिक्रिया आणि संभाव्य दुष्परिणामांचा पुरेसा विचार केला जात नाही.
ही गोष्ट किती खरी आहे, हे स्पष्ट नाही, पण कोब्रा इफेक्ट अनेक वेळा सिद्ध झाला आहे.
फ्रिकॉनॉमिक्स (Freakonomics) पॉडकास्टमध्ये कोब्रा इफेक्टची काही उत्कृष्ट उदाहरणे दिली आहेत :
- फ्रेंच-वसाहतकालीन हनोईमध्ये उंदरांवर बक्षीस ठेवले होते, जिथे उंदराची शेपटी आणल्यावर बक्षीस मिळत असे. या योजनेचाही सापांच्या गोष्टीसारखाच शेवट झाला.
- जॉर्जियातील फोर्ट बेनिंगमध्ये, प्रत्येक रानडुक्कराच्या शेपटीसाठी $४० देऊन त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण, शिकारी त्या रानडुक्करांना विविध प्रकारचे खाद्य पदार्थ देऊन आकर्षित करत असावेत. त्यामुळे अनेक रानडुक्कर शिकारींपासून दूर राहून खाण्यापिण्यावर चांगले पोसले आणि त्यांची संख्या खूप वाढली.
- कोलंबियाची राजधानी बोगोटाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रत्येक गाडीला आठवड्यातून एक दिवस चालवण्यावर निर्बंध घातले. त्याचा परिणाम असा झाला की, लोकांनी एकापेक्षा जास्त गाड्या विकत घेतल्या आणि वीकेंडला जास्त गाडी चालवायला लागले.
- ज्या भागात दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करायचे होते, त्या भागांची यादी जाहीर झाल्यावर, भू-विकासकांनी (land developers) ती जमीन संरक्षित होण्यापूर्वीच तिथे बांधकाम सुरू केले.
माणसे हुशार असतात. प्रोत्साहन (Incentives) काम करतात परंतु तुम्ही कशासाठी प्रोत्साहन देत आहात, याबाबत काळजी घ्या.
आपल्या आत्मचरित्रात, मार्क ट्वेन म्हणतात की त्यांची पत्नी, ओलिव्हिया लँगडन क्लेमेन्स, यांना असाच एक अनुभव आला होता:
"एकदा हार्टफर्डमध्ये माश्या इतक्या मोठ्या संख्येने आणि त्रासदायक होत्या की, मिसेस क्लेमेन्सने जॉर्जला मारलेल्या सर्व माश्यांसाठी बक्षीस देण्याची कल्पना केली. मुलांना यातून अचानक श्रीमंत होण्याची संधी दिसली.. कोणतेही सरकार तिला सांगू शकले असते की, अमेरिकेत लांडगे, ऑस्ट्रेलियात ससे आणि भारतात साप वाढवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांना मारण्यासाठी बक्षीस देणे. मग प्रत्येक देशभक्त त्यांचे प्रजनन करायला लागतो."
As Charlie Munger famously said, "Show me the incentive, and I'll show you the outcome."
कोब्रा इफेक्टचे आणखी एक उदाहरण performance metrics मध्ये पाहिले जाऊ शकते. जेव्हा एखादा मॅनेजर आपल्या टीमसाठी लक्ष्य निर्धारित करतो आणि टीम केवळ ते लक्ष्य साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा ते त्यांच्या कामाच्या इतर महत्त्वाच्या पैलूंना दुर्लक्षित करू शकतात, किंवा लक्ष्य गाठण्यासाठी अनैतिक वर्तनातही सामील होऊ शकतात.
२००८ मध्ये जेव्हा रतन टाटा यांनी 'एक लाखाची कार' टाटा नॅनो बाजारात आणण्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. सामान्य भारतीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणे, हा यामागे एक उदात्त हेतू होता. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबांना एक सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देणे, ही मूळ समस्या होती आणि 'सर्गातील सर्वात स्वस्त कार' हा त्यावरचा उपाय होता. पण झाले उलटेच. टाटा मोटर्सने नॅनोचे मार्केटिंग 'स्वस्त गाडी' म्हणून केले. भारतीय समाजात गाडी हे केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर ते सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. 'स्वस्त गाडी' हा टॅग लागल्यामुळे लोकांनी नॅनोकडे कमीपणाच्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली. ती 'गरिबांची गाडी' म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी ती प्रतिष्ठेमुळे नाकारली आणि ज्यांच्यासाठी ती बनवली होती, त्यांना ती विकत घेतल्यास आपल्या आर्थिक परिस्थितीची जाहिरात केल्यासारखे वाटू लागले. इथे गाडी परवडणारी बनवण्याचा उपायच तिच्या अपयशाचे कारण ठरला. मार्केटिंगमधील हा "कोब्रा इफेक्ट" होता, जिथे एका चांगल्या उत्पादनाला चुकीच्या ब्रँडिंगमुळे अपयशाचा सामना करावा लागला. कोब्रा इफेक्ट !
एका मोठ्या औषध कंपनीने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारे एक प्रभावी औषध बाजारात आणले. वाढते कोलेस्ट्रॉल ही एक मोठी आरोग्य समस्या होती आणि हे औषध त्यावर एक उत्तम उपाय म्हणून पाहिले जात होते. औषध प्रभावी होते, पण त्याचा एक हलका दुष्परिणामही होता आणि तो खूप कमी लोकांमध्येच दिसून यायचा. कंपनीचे हे औषध चांगले चालत होते. विक्री अधिक वाढविण्यासाठी कंपनीने जाहिराती वाढविण्याचे ठरविले. औषधांच्या जाहिरातींमध्ये त्याचे दुष्परिणाम देखील सांगण्याचा कायदा होता. त्यामुळे कंपनीला तसे करावे लागले. या जाहिरातींचा परिणाम उलटाच झाला. दुष्परिणाम कळल्यामुळे लोकांनी ते औषध घेतले तर नाहीच, उलट जे लोक हे औषध घेत होते त्यांनी देखील ते घेणे बंद केले. कोब्रा इफेक्ट !
ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध एअरलाइन कंपनी 'क्वांटास'ने आपल्या ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाण्यासाठी सोशल मीडियावर एक स्पर्धा सुरू केली. त्यांनी लोकांना त्यांचे 'क्वांटाससोबतचे आनंदी अनुभव' शेअर करण्यास सांगितले आणि त्यासाठी आकर्षक बक्षिसेही ठेवली. कंपनीचा उद्देश सकारात्मक प्रसिद्धी मिळवणे हा होता. पण झाले भलतेच. लोकांनी या संधीचा फायदा घेत कंपनीबद्दलच्या तक्रारी, वाईट अनुभव आणि समस्या सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली. चांगल्या अनुभवांऐवजी नकारात्मक कमेंट्सचा पूर आला. जी मोहीम ब्रँडची प्रतिमा उजळण्यासाठी सुरू केली होती, तीच त्यांच्यासाठी एक जनसंपर्क संकट (PR crisis) बनली. इथे ग्राहकांशी संवाद साधण्याचा उपायच त्यांच्या नाराजीला वाट करून देणारा मंच ठरला. कोब्रा इफेक्ट !
"कोब्रा इफेक्ट" आपल्याला सांगतो की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे. केवळ समस्येवर लक्ष केंद्रित न करता, त्यावरील उपायामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य नवीन समस्यांचाही विचार केला पाहिजे. यासाठी दूरदृष्टी, सखोल विश्लेषण आणि मानवी मानसशास्त्राची समज आवश्यक आहे. असा विचार करण्याच्या पद्धतीला "second order thinking" म्हणतात.
@ यशवंत मराठे