आज आपण शहरात अंधार झाला की लगेच विजेचे बटन ऑन करतो आणि दिवा पेटतो. पण हे इलेक्ट्रिकचे दिवे अस्तित्वात कधी आले? इ.स. 1840 च्या सुमारास जरी विजेच्या दिव्याची प्राथमिक सुरुवात झाली असली तरी त्याचा खरा प्रसार थॉमस एडिसन यांच्या संशोधनानंतर, म्हणजेच इ.स. 1880 नंतर, झाला. याचाच अर्थ या गोष्टीला अजून 150 वर्षे देखील व्हायची आहेत.
जगातील, खरे तर आफ्रिकेतील, सुमारे दहा पेक्षा जास्त असे देश आहेत जिथे 15% पेक्षा कमी लोकांना विजेची उपलब्धता आहे. दुसऱ्या अंगाने विचार केला तर ही अशी लोकसंख्या अंधारावर मात करण्यासाठी अजूनही पूर्वापार पद्धती वापरात असणार.
म्हणूनच असे वाटले की काय असेल या दिव्यांचा इतिहास? आदिमानवापासून दिव्याचा उपयोग तमोहर म्हणून नक्कीच केला जात असणार पण ते दिवे कसे असतील? आणि त्यामध्ये कालानुरूप काय काय बदल घडले असतील? त्यातूनच या लेखाचा उगम झाला आहे.
तेलाचे दिवे
दिव्याचा प्रथम शोध अश्मयुगात, म्हणजे इ.स.पूर्व सुमारे 70000 वर्षांपूर्वी लागला. हा दिवा दगडात खोदलेला असून खोलगट केलेल्या भागात प्राणिजन्य चरबी घालीत व शेवाळे वा तत्सम भिजणारा पदार्थ त्यात घालून तो पेटवीत. अशा स्वरूपाचे दिवे अलास्कातील एस्किमो लोक व अल्यूशन बेटातील लोक अद्यापही वापरतात. अशा प्रकारचा पुराश्मयुगातील एक ओबडधोबड दिवा ल मूस्ट्ये येथे 1928 साली सापडला.
भूमध्य समुद्रकाठच्या भागातील प्रदेशात आणि पूर्वेकडील देशांत शिंपल्याचे दिवे वापरीत असत. पुढे ॲलॅबॅस्टर (एक प्रकारचे मऊ खनिज), माती व धातू यांच्या पात्रांना शिंपल्यासारखा आकार देऊन त्यांचे दिवे वापरात आले. अशा आकाराचे मातीचे दिवे पॅलेस्टाइन, पर्शिया, एड्रिॲटीक व भूमध्य समुद्रातील बेटांत उत्खननामध्ये सापडले आहेत. मेसोपोटेमियामधील (हल्लीच्या इराकमधील) उत्खननामध्ये इ.स.पूर्व 8000 च्या सुमाराचे वातीसाठी चोच असलेले मातीचे दिवे (पणत्या) सापडले आहेत. ईजिप्त व चीन या देशांत प्राचीन काळी बशीच्या आकाराचे मातीचे किंवा काशाचे दिवे वापरत असत. काही वेळा अशा दिव्यांच्या मध्यभागी वात धरून ठेवण्यासाठी काट्याच्या आकाराचा उंचवटा असे, तर काही दिव्यांत वात ठेवण्यासाठी खाच असून त्यातून आलेली वात दिव्यांच्या कडेवर येऊन जळेल अशी योजना होती. या प्रकारचे दिवे आफ्रिकेत सर्रास प्रचारात होते. या दिव्याचा प्रसार पूर्व आशियात झाला व तेथून तो पॅसिफिक महासागरापलीकडील प्रदेशात गेला असावा, कारण अलास्का व मेक्सिको येथील उत्खननांत असे दिवे सापडले आहेत. ईजिप्त व इराणमध्ये इ. स. पूर्व 2700 वर्षांपूर्वीचे तांब्याचे व काशाचे दिवे अनेक वेळा सापडले आहेत. इ.स.पूर्व 1000 वर्षांपर्यंत दिव्यात फारशी सुधारणा झाली नव्हती तोपर्यंत एखाद्या वनस्पतीची काडी किंवा तंतू बशीसारख्या पसरट भांड्यात घेतलेल्या (द. यूरोपात) ऑलिव्ह तेलात किंवा अन्य टणक सालीच्या फळांपासून काढलेल्या तेलात ठेवून दिवा तयार करीत असत. त्यानंतर इ.स.पूर्व चार–पाचशे वर्षांपासून घरोघरी तेलाचे दिवे वापरण्यास सुरुवात झाली.
बऱ्याच ठिकाणी दगडी दिवे देखील वापरण्यात येत होते
इ.स.पूर्व 2000 च्या सुमारास चीनमध्ये दिव्याचा वापर सुरू झाला असावा. एका लहान पात्रात मेणबत्ती ठेवण्यात येत असे व घडी करता येईल अशा कागदी वा रेशमी कंदिलात ती ठेवीत. असे कंदील जपान आणि चीनमध्ये बऱ्याच काळापर्यंत फारसा बदल न होता वापरात होते. हे कंदील दंडगोलाकार वा गोलाकार असत. अद्यापही अशा तऱ्हेचे दिवे तेथे मिळतात.
इ.स.पूर्व सातव्या शतकापर्यंत ग्रीसमध्ये मशाली व अग्निपात्रे वापरीत असत. तेथे प्रथम वापरात आलेले दिवे त्या काळच्या ईजिप्तमधील दिव्यासारखेच होते. नंतर एक वा अनेक भोके असलेल्या पेल्यासारख्या आकारचा मातीचा दिवा ग्रीसमध्ये वापरात आला. या भोकांतून वाती बाहेर काढण्यात येत. दिव्याच्या वरच्या बाजूला एक गोलाकार भोक असून त्यातून दिव्यात ज्वलनशील पदार्थ घालता येत असे. तसेच दिवा उचलून नेण्यासाठी एक मूठ असे. या दिव्यांना उष्णतारोधी लाल वा काळ्या रंगाची झिलई देण्यात येई. काशाचे दिवे बाळगणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. काशाच्या सामान्य दिव्याला बोटे ठेवण्यासाठी कडे व अंगठा ठेवण्यासाठी वरती चंद्रकोरीच्या आकाराची मूठ असे. काशाचे टांगते दिवेही तेथे लोकप्रिय होते.
रोमन लोकांनी भाजलेल्या मृदेचे (टेरा कोटाचे) दिवे तयार करण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीत दिव्याचे दोन भाग प्रथम तयार करून मग ते एकत्र जोडून एकसंध दिवा तयार करीत. अशा दिव्यावर नक्षीकाम करण्यात येई. चकाकणाऱ्या व साध्या दिव्यांना दोन किंवा अधिक चोची पाडीत असत.
धातूचेही दिवे वरील पद्धतीने तयार करीत पण त्यांचे आकार बरेच गुंतागुंतीचे, सामान्यतः प्राण्यांच्या वा वनस्पतींच्या आकाराचे असत अशा स्वरूपाचे मोठ्या आकारमानाचे दिवे सार्वजनिक व करमणुकीच्या ठिकाणी इ.स. पहिल्या शतकापर्यंत वापरले जात होते. या शतकात रोमन लोकांनी पहिला शिंगाचा कंदील (दिव्यातील ज्योतीचे वाऱ्यापासून रक्षण करण्याची योजना असलेला दिवा) तयार केला. तो नळकांड्याच्या आकाराचा व विभागलेल्या माथ्याचा होता.
मध्ययुगातील दिव्यांसंबंधीच्या प्रगतीविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. रोमन लोकांच्या बंदिस्त स्वरूपाच्या दिव्यांच्या मानाने या काळातील दिव्यांचा दर्जा कमी होता. दिवे उघडे व बशीच्या आकाराचेच असत. त्यांतील वाती बुचाच्या वा लाकडाच्या साहाय्याने तरंगत ठेवलेल्या असत. अशा प्रकारच्या दिव्यांपैकी तांबड्या काचेचे आणि शोभिवंत पितळी धारकावरील देवळाच्या गाभाऱ्यातील दिवे अद्यापही यूरोपातील काही चर्चमध्ये वेदीसमोर टांगलेले आढळतात. अशा दिव्यात राईचे (कोल्झा) तेल वापरीत असत.
याच काळातील ज्यू लोक वापरीत असलेला ‘खानुकाʼ (ज्यू लोकांच्या एका उत्सवावरून पडलेले नाव Hanukkah) दिवा भारतातील पंचारती दिव्यासारखा होता.
इस्लामी राष्ट्रांतील मशिदींमध्ये असणारे दिवे बायझंटीन प्रकारचे असून ते टांगते असत. हे दिवे भोके असलेल्या व नक्षीदार अशा पितळी वा काशाच्या आवरणात ठेवलेले असल्यामुळे खालच्या बाजूने भरपूर प्रकाश मिळे. सुमारे इ.स.1250 नंतर तेथे काचेचे दिवे वापरात आले.
सतराव्या शतकात मध्यपूर्व भागात व जर्मनीत दिव्याचा उपयोग कालमापनासाठी करीत असत. हा दिवा मेणबत्तीच्या आकाराचा असून वरच्या बाजूला तेलाने भरलेली एक बाटली असे व तिच्यावर तासदर्शक आकडे कोरलेले असत. या बाटलीतील तेल खाली असलेल्या एका लहान बाटलीत पडे. या बाटलीतील एका वातीद्वारे तेल जळत असे आणि त्यानुसार वरच्या बाटलीतील तेलसाठा कमी होई व त्यावरून काल मोजणे शक्य होई.
बत्ती
एखाद्या घन पदार्थाचा काठीसारखा लांब बारीक तुकडा पेटवल्यावर जर प्रकाश देणारी ज्वाला त्याला सतत येत रहात असेल, तर त्या तुकड्याला बत्ती म्हणतात. तागाच्या जोख्यांची वा माडाच्या पात्यांची चूड ही बत्तीच आहे. बत्ती सुवाह्य असते पण ती एकाच जागीही वापरता येते. बत्तीच्या अस्तित्वासंबंधी भारतातील प्राचीन पुरावे अद्याप तरी उपलब्ध नाहीत.
युरोपीय इतिहासावरून बत्तीचा उपयोग व धंदा इसवी सनाच्या आरंभापर्यंत मागे जातो. युरोपीय लोक जेव्हा आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना तेथील आदिवासी लोक उजेडासाठी तेलबिया बशीसारख्या मातीच्या भांड्यात जाळताना आढळले. झाडाच्या बारीक फांदीत या बिया खोवून हे लोक त्यांचीही बत्ती करीत. इ.स.100 च्या सुमारास ग्रीक आणि रोमन लोकांच्या बत्त्या फ्लॅक्सच्या दोऱ्यांना डांबर किंवा मेण लावून केलेल्या असत. काहींच्या मते फिनिशियन लोकच इ.स.400 च्या सुमारास मेणाच्या बत्त्या वापरणारे पहिले होत. अशा प्रकारे यूरोपात बत्तीची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा कित्येक शतके - सुमारे तेथील मध्ययुगाच्या अखेरपर्यंतही (चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत) - घरातून सामान्यतः तेलाचे दिवेच वापरणे चालू राहिले व बत्तीचा उपयोग पुष्कळच तुरळक होत होता. पण नंतर सोळा ते अठराव्या शतकांत गरीब व मध्यम वर्गांतील लोक उजेडासाठी बत्त्याच जास्त करून वापरीत होते. अगदी सुरुवातीच्या बत्त्या रश झाडाच्या जोरव्या चरबीत बुडवून त्यांच्या करीत. नंतर या कामासाठी हलक्या लाकडाचे तुकडे चरबी किंवा मधमाश्यांच्या पोळ्यांचे मेण यात बुडवून वापरण्यात येऊ लागले. अठराव्या शतकात देवमासे पकडण्याच्या उद्योगाला जोर आल्यानंतर स्पर्मासेटी (वसातिमी म्हणजे स्पर्मव्हेल या माशाच्या शिरांतील तेलामधील घन पदार्थ) हा पदार्थ जास्त वापरात येऊ लागला. स्पर्मासेटी बत्तीची ज्वाला बिनधुराची आणि निश्चल अशी असते. म्हणून मग ती कृत्रिम प्रकाशाच्या मापनाचे एकक म्हणून पुढे वापरात आली. 1823 मध्ये स्टिअरीन या रसायनाचे अलगीकरण व 1850-60 च्या दरम्यान खनिज तेलापासून काढण्यात आलेले मेण (पॅराफीन) यामुळे बत्त्यांची बनावट सुधारली. सांप्रतही बत्त्या पॅराफीन मेणाच्याच करतात. ख्रिस्ती धार्मिक विधीत मेणबत्त्यांना मोठे महत्त्व आहे. पण हिंदू धर्मात मेणबत्तीला स्थानच नाही.
खनिज तेलाचे दिवे
एड्रिॲटिक समुद्राच्या किनाऱ्यावर सापडलेल्या खनिज तेलाचा दिव्यांसाठी उपयोग केला जातो, असा इ.स.50 मधील रोमन शास्त्रज्ञ थोरले प्लिनी याचा उल्लेख सापडतो. दिव्यांसाठी खनिज तेलाचा उपयोग केल्याचा हा पहिलाच निर्देश आहे. जपानी इतिहासात इ.स.615 च्या सुमारास पेटत्या पाण्याचा उल्लेख आढळतो. ‘बाकू (द. रशिया) येथील खाणीत सापडलेल्या तेलाचा प्रकाशाकरिता समाधानकारक पद्धतीने उपयोग करता येतो’ हा मार्को पोलो यांचा तेराव्या शतकातील दिव्यासाठी खनिज तेलाच्या केलेला उपयोगाचा त्यानंतरचा लिखित पुरावा आहे. हे तेल मूळ अपरिष्कृत स्वरूपात असल्यामुळे बरेच दाट असे, त्यामुळे उभ्या वातीतून ते सहजपणे वर चढत नसे. ही अडचण दूर करण्यासाठी इ.स.पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात हिरो या ॲलेक्झांड्रियाच्या शास्त्रज्ञांनी हवेवर मिठाच्या दाट विद्रावाचा दाब देऊन या दाबित हवेने तेल वातीतून वरवर चढत जाणारा एक दिवा तयार केला होता. 1490 साली लिओनार्दो दा व्हींची यांनी लांबट तोंडाची काचेची चिमणी पाण्याने भरलेल्या काचेच्या गोलात बसवून पाहिली तेव्हा ज्योत संथपणाने पेटली, शिवाय पाण्याने भरलेल्या गोलाचा भिंगासारखा उपयोग होऊन रात्री वाचन करण्याइतका प्रखर प्रकाश मिळू लागला. चौदा ते सतरा या शतकांच्या दरम्यान अनेक प्रकारचे दिवे बनविण्यात आले, पण प्रकाशनाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने त्यांत सुधारणा झाली नव्हती.
यात्रेकरूंचा बेटी नावाचा धातूचा दिवा या सुमारास प्रचारात आला. तो ओवाळण्याच्या दिव्यासारखा होता. त्यात माशाचे तेल वापरीत असत.
इ.स.1784 साली एमे अरगँड या स्विस भौतिकी वैज्ञानिकाने एका दिव्याचे पेटंट घेतले. त्यात दिव्याच्या तळातून वर आलेली एक पत्र्याची नळी होती. नळीभोवती वातीची नळी ठेवून दिव्याच्या बाहेरून एक दुसरी पत्र्याची नळी बसविली होती. ज्योतीच्या वर पत्र्याची चिमणी होती. चिमणीमुळे ज्योतीला नियमितपणाने हवेचा पुरवठा होत असे. दिव्याला काचेची चिमणी बसविली म्हणजे ज्योतीची थरथर कमी होते ही गोष्ट अपघातानेच अरगँड यांच्या साहाय्यकाच्या ध्यानात आली. कृत्रिम प्रकाश मिळविण्याच्या प्रयत्नांचा विचार केला, तर अरगँड दिव्यावरील चिमणीचा शोध हा या वेळेपर्यंतचा सर्वांत मोठा शोध होता. 1800 मध्ये बेर्त्रां कार्सेल यांनी अरगँड दिव्यात घड्याळी पंप बसवून त्या पंपाने वातीत दाट तेल सतत वर चढत राहील अशी व्यवस्था केली. या सुधारणेनंतर अरगँड दिवा हा प्रकाशमापनाचे प्रमाण म्हणून गणला जात असे. बेंजामिन फ्रॅंकलिन यांना एकमेकांशेजारी थोड्याच अंतरावर ठेवलेल्या दोन ज्योती एका ज्योतीच्या दोन दिव्यांपेक्षा जास्त प्रकाश देतात असे आढळून आले.
इ.स.1850-51 मध्ये जेम्स यंग यांनी दगडी कोळशाच्या ऊर्ध्वपातनाने काढलेले केरोसिन सदृश तेल वापरणारे दिव्यांचे पुष्कळ प्रकार प्रचारात आले व हे तेल दिव्यांना पूर्वीपेक्षा जास्त चांगले असल्याचे वाटू लागले परंतु एडविन ट्रेक यांनी 1859 मध्ये केरोसिनचा शोध लावल्यावर तेच तेल प्रकाश देणाऱ्या दिव्यांसाठी जास्त चांगले व स्वस्त इंधन आहे असे दिसून आले. त्यानंतर दाट तेलाचे दिवे एकदम मागे पडले.
पुढील वीस वर्षांत नव्या नव्या सुधारणा अंतर्भूत असलेली अशी दिव्यांची प्रतिवर्षी सरासरीने 80 एकस्वे (पेटंट्स) देण्यात येत होती. या काळातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जोसेफ हिंक्स यांचा 1865 मधील डुप्लेक्स ज्वालक व वेल्स यांचा 1868 मधील उज्ज्वाला (फ्लेअर) पद्धतीचा दिवा. यात केरोसिनच्या बाष्पात दाबित हवेच्या साहाय्याने केरोसिनचा फवारा सोडलेला असे आणि त्यामुळे दिव्याला दीप्तिमान ज्योत येई. आणखी एक उल्लेखनीय प्रकार म्हणजे सुमारे 1885 मधील आर्थर किटसन यांचा दिवा, याला प्लॅटीनमची वायुजाळी असून ती दाबित हवेखालील केरोसिनच्या बाष्पाच्या ज्वलनाने प्रदीप्त होऊन प्रकाश देई. हे दिवे भारतातही विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत वापरात होते. यानंतरची महत्त्वाची सुधारणा 1929 पासून भारतात प्रस्तृत झालेले युरोपिय पेट्रोमॅक्स दिवे.
यात प्लॅटिनमाच्या ऐवजी सी.ए. व्हॉन वेल्सबाख यांनी शोधून काढलेली वेल्सबाख वायुजाळी वापरली जात होती. पण लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या भागात विणलेली पट्टीवात, ती वरखाली करण्याला दंतचक्र असलेली चावी, भोकाचा ज्वालक धारक आणि काचेची चिमणी असलेले केरोसिनाचे दिवे जगभर दिसू लागले, ही होय.
वायूचे दिवे
ख्रिस्तपूर्व अनेक शतके चिनी लोक नैसर्गिक वायूचा प्रकाशासाठी उपयोग करीत असत. 500–550 मी. खाली असलेला वायू बांबूच्या नळकांड्यांतून वर आणून सेचवान प्रांतात त्याचा मिठाच्या खाणीतून आणि घरातून उजेडासाठी उपयोग करीत असत. ईजिप्त व इराणमध्येही जमिनीला केव्हा केव्हा भेगा पडून त्यांतून ज्वलनशील वायू बाहेर येई पण त्याचा उजेडासाठी उपयोग करीत की नाही हे ज्ञात नाही. 1792 साली विल्यम मर्डॉक यांनी इंग्लंडमध्ये आपल्या राहत्या घरी उजेडासाठी विस्तृत प्रमाणात दगडी कोळशाच्या वायूचा उपयोग केला. त्यांनी हा वायू मोठ्या लोखंडी बकपात्रात तयार करून तो 22 मी. लांब नळातून उपयोगासाठी वाहून नेला होता. 1798 साली मर्डॉक यांनी बर्मिंगहॅममधील एका कारखान्यात या कोळशाच्या वायूच्या दिव्यांनी प्रकाश योजना केली. यानंतर जवळजवळच्या दुकानांतून ते दिव्यासाठी वायू पुरवू लागले परंतु हा वायू वापरणे धोकादायक व अव्यवहार्य आहे, अशी त्याच्या बद्दल ओरड झाल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकला नाही. त्यानंतर 1807 साली एफ्. ए. विंझर या जर्मन गृहस्थांनी लंडन शहरातच दगडी कोळशाच्या वायूचा यशस्वी रीतीने उपयोग करून दाखविला आणि वायूविषयी पसरलेले गैरसमज दूर केले. त्यामुळे विंझर यांना वायूचा प्रकाशासाठी उपयोग करण्याच्या कल्पनेचे जनक म्हणतात.
वायु दिव्यांचा प्रसार लंडनमध्ये 1813 पासून व पॅरिसमध्ये 1818 पासून झाला व लगोलग यूरोप खंडातील प्रमुख शहरांत वायूचे दिवे दिसू लागण्यास सुरुवात झाली पण या दिव्यात जाळी नसून बन्सन ज्वालक असे. अमेरिकेत 1806 साली न्यूपोर्ट (ऱ्होड आयलंड) येथील डेव्हिड मेलव्हिन यांनी आपल्या घरात आणि घरासमोर रस्त्यावर वायूचे दिवे लावले. फिलाडेल्फियातील न्यू थिएटरमध्ये 1816 साली प्रथमच वायूचा प्रकाशासाठी उपयोग करण्यात आला.
इ. स. 1820-80 या साठ वर्षांच्या काळात अनेक प्रकारच्या सुधारणा करून ज्वालक तयार करण्यात आले. यात मुख्यतः मत्स्यपुच्छ (फिशटेल) ज्वालक प्रमुख होते. 1855 साली बन्सक ज्वालक आणि 1879 साली सग-अरगँड ज्वालक (विल्यम सग व अरगँड यांच्या नावाने ओळखण्यात येणारा) यांचे शोध लागले. वेल्सबाख यांनी दहा वर्षे प्रयोग करून वायुजाळी तयार केली आणि 1887 च्या फेब्रुवारी महिन्यात लंडन येथे आपली प्रकाश पद्धती प्रथम सादर केली. त्यानंतर 1900 सालापासून निर्ज्योत परंतु प्रदीप्त जाळीच्याद्वारे मिळणारा वायूचा प्रकाश यूरोप–अमेरीकेत रूढ झाला. या जाळ्या तयार करण्यासाठी सिरीया व थोरिया ह्या ऑक्साइडांचा वापर करतात. यांच्या विद्रावात सुती दोरा भिजवून वाळवितात व तो जळल्यावर फक्त ऑक्साइडे राहतात.
ॲसिटिलीन वायू 1836 सालापासून ठाऊक असला, तरी 1993 साली आंरी ग्वासां यांनी तो तयार करून त्याचा उपयोगही करून दाखवला. कॅल्शियम कार्बाइड पाण्यात टाकले की, ॲसिटीलीन वायू तयार होतो आणि तो पेटविला म्हणजे प्रखर प्रकाशही मिळतो असे टॉमस एल्. विल्सन यांनी त्याच वेळी अमेरिकेत दाखविले. 1909 साली अमेरिकेतील 290 गावांत या वायूचा प्रकाशाकरिता उपयोग करण्यात येत होता.
यूलिउस पिंट्श या जर्मन शास्त्रज्ञांनी रेल्वेच्या रस्त्यातील दिव्यांना म्हणून पिंट्श वायू शोधून काढला. यूरोपात हा शेल खडक वा खनिज तेलापासून काढण्यात आला होता. हा वायू अनेक वर्षे वापरात होता. तो दीपगृहे आगबोटींवरही वापरीत असत. अमेरिकेत तो 1866 साली प्रसृत करण्यात आला. विजेच्या साहाय्याने प्रकाशयोजना करावयाची कल्पना रूढ झाल्यानंतर हळूहळू वायू वापरण्याचे प्रमाण कमीकमी होत गेले. अमेरिकेत 1911 पासून वायूची जागा विजेने घेण्यास सुरुवात झाली पण यूरोपात तो पुढे आणखी काही वर्षे तग धरून राहिला.
भारतातील परिस्थिती काय आहे?
ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात दार्जिलिंग, कलकत्ता, सिवमुद्रम, मेत्तूर आणि खोपोली (टाटा) येथे वीज निर्मितीची जरी सुरुवात केली असली तरी विजेचा खरा प्रसार स्वातंत्रोत्तर काळातच झाला. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा सुमारे 18500 गावे यापासून वंचित होती. त्यांनी 1000 दिवसात या सर्व गावांमध्ये वीज पोहोचेल असे आश्वासन दिले आणि त्यानुसार दि. 28 एप्रिल 2018 रोजी त्यांनी असे जाहीर केले की भारतातील सर्व, म्हणजेच सुमारे 600,000, गावांमध्ये वीज पोहोचली आहे.
पण दुर्दैवाने त्याचा अर्थ प्रत्येक घरात वीज आहे असा मात्र होत नाही. कारण सरकार दरबारी जर विद्युतीकरण केलेल्या घरांची संख्या किमान 10% असल्यास आणि शाळा, आरोग्य केंद्रे, दवाखाने, समुदाय केंद्रे आणि ग्राम परिषदांसह सार्वजनिक इमारतींना वीज पुरवली गेली तर ते गाव विद्युतीकृत आहे असे मानले जाते. परंतु जागतिक बँकेची आकडेवारी दर्शवते की भारतातील सुमारे 200 दशलक्ष (वीस कोटी) लोकांना, म्हणजेच लोकसंख्येच्या पंधरा टक्के, अजूनही वीज उपलब्ध नाही. आज भारतातील फक्त सहा राज्ये (तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, पंजाब, गोवा आणि गुजरात) अशी आहेत जिथे प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे.
आज ऊर्जेची मागणी दर दिवशी वाढतेच आहे आणि नैसर्गिक संसाधने (resources) मात्र मर्यादितच राहणार आहेत त्यामुळे आपण जितकी ऊर्जेची बचत करू शकू तेवढी चांगलीच.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com