अमेरिकेतील West Point Academy आणि इंग्लंड मधील Sandhurst येथे त्यांच्या देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना Strategic War Planning चे प्रमुख उदाहरण म्हणून कोणत्या लढाईबद्दल शिकवले जाते?? त्याच प्रमाणे याच लढाईचे प्रशिक्षण जगातील प्रमुख देशांतील सैन्य अधिकाऱ्यांना देखील दिले जाते.
तुम्हाला ठाऊक आहे का की मी कुठल्या लढाईबद्दल बोलतोय. ही लढाई झाली आपल्या देशात आपल्याच अंगणात म्हणजेच महाराष्ट्रात नाशिक जवळील पालखेड येथे. परंतु असे काय खास होते या लढाईत ?
एका बाजूला होता हिंदवी स्वराज्याचा तरुण सेनापती, जो फक्त अठ्ठावीस वर्षांचा होता. समोर होता त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुपटीहून अधिक आणि कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त 25000 आणि त्याच्या शत्रूकडे 40000 आणि त्या काळातील सर्वोत्तम 650 तोफांचा तोफखाना.
तो तरुण सेनापती राज्यापासून दूर दक्षिणेला असताना, शत्रूच्या सेनापतीने खुद्द राजधानीवर चाल केली आणि ती देखील आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह. शत्रूची अपेक्षा होती की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल... पण... पण... घडले भलतेच... तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसताच शिरला नाही तर त्याने धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. त्यामुळे आता शत्रूलाच त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. राजधानी जिंकण्याचा विचार सोडून शत्रूचा सेनापती त्या तरुण वादळामागे धावला,
पण वादळच ते... कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते... त्यातून अचानक बातमी आली - ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूच्याच राजधानीचा घास घेणार... शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.
अन तशातच बातमी आली की शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरूण पोराने लुटून नेला... शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता नाशिक-मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे... आधीच दमछाक आणि आता पाणीच तोडले या वादळाने.
अखेर व्हायचे तेच झाले... तो बलाढ्य, अनुभवी शत्रू सेनापती एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा संपूर्ण पराजय आणि स्वराज्याचा दैदिप्यमान विजय आणि तो ही आपला एकही सैनिक न गमावता...
जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यती अशी ही लढाई असल्यामुळेच प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.
25 फेब्रुवारी 1728 - पालखेडची लढाईबलाढ्य शत्रू:- निजाम उल मुल्क, वय: 57तरुण वादळ:- थोरले बाजीराव पेशवे, वय: फक्त 28
अशा गौरवास्पद आणि दैदिप्यमान विजयाबद्दल बाजीराव पेशवेंचा अभिमान तर वाटतोच पण गर्वाने छाती देखील फुलून येते.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com