सोशल मीडिया या महासागराच्या मंथनातून रोज भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या काही गोष्टी वाचायला मिळत असतात. आपल्या पूर्वजांचे अगाध ज्ञान एकतर टवाळकीचा विषय होते नाहीतर दुराभिमानाचे.
त्यातच मग पद्मावत, पृथ्वीराज, पानिपत सारखे चित्रपट त्यांच्या सिनेमॅटिक लिबर्टीसहित रिलीज होतात. पृथ्वीराज चौहानने घोरीला शब्दवेधी बाणाने ठार मारले ह्या कथेला ठोस पुरावे नसतानाही आपण खरे मानू लागतो. छत्रपती संभाजीराजांनी एका दिवसात लढाईत एक लाख शत्रू मारले किंवा सिंहाची शिकार करताना जबड्यासह उभा फाडला सारख्या अतिरंजित गोष्टी सत्य मानू लागतो.
हे सर्व पाहिल्यावर अस वाटत की गेल्या 1000 वर्षांच्या आपल्या इतिहासातून आपण शिकलो काय? आणि हे शिकवायचं तरी कोणी?
मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
11 व्या शतकाच्या दरम्यान अल् बिरुनी नावाचा परकीय प्रवासी भारतात आला होता. भारतात प्रदीर्घकाळ वास्तव्य केल्यानंतर त्याने इथली संस्कृती, स्वभाव, राजकीय परिस्थिती, ज्ञान.. ह्या सर्वांची माहिती "तहकीकात-ए-हिंद" ह्या आपल्या प्रवासवर्णनात शब्दबद्ध केली. कोण होता हा बिरुनी?
बिरुनीचा जन्म मध्य आशियातील (उझबेकिस्तान) ख्वारिझमच्या अफ्रिघिड राजवंशाची राजधानी काथ येथील खिझा प्रदेशात इसवी सन 973 मध्ये झाला. त्याने तिथे आयुष्यातील पहिली पंचवीस वर्षे घालवली. त्याने तिथे इस्लामिक न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, व्याकरण, गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान आणि इतर बहुतेक विज्ञानांचा अभ्यास केला.
इसवी सन 1017 मध्ये, जेव्हा गझनीचा महमूद शासक होता, तेव्हा बिरुनीसह बहुतेक विद्वानांना गझनवी राजवंशाची राजधानी गझनी येथे कैदी म्हणून नेण्यात आले. परंतु बिरुनीचे ज्ञान लक्षात घेऊन त्याला दरबारी ज्योतिषी बनवले गेले आणि नंतर 11 व्या शतकात गझनीच्या भारतावर केलेल्या हल्ल्यात तो काही वर्षे येथे राहिला. ज्या वेळी बिरुनी भारतात आला तेव्हा त्याचे वय 44 वर्षे होते.
तो खगोलशास्त्रज्ञ, भूमितज्ञ, इतिहासकार आणि तर्कशास्त्रज्ञ होता. तो इतका अभ्यासू होता की त्याचे सर्वात जुने चरित्रकार आपल्याला सांगतात "त्याच्या हातातून पेन कधीच सुटले नाही, किंवा त्याची नजर कधीही पुस्तकातून निघाली नाही आणि वर्षातील दोन दिवसांचा अपवाद वगळता त्याचे विचार कायम त्याच्या अभ्यासाकडेच असायचे." आणि मुख्य म्हणजे त्याला सत्याबद्दल खूप आदर होता.
भारतातील त्याच्या वास्तव्यात त्याची भारताशी संबंधित सर्व गोष्टींशी त्यांची ओळख झाली. त्याला भारतीय संस्कृती खूप भावली आणि त्याने संस्कृत, भारतीय तत्त्वज्ञान आणि या मातीची सामाजिक - आर्थिक स्थिती त्याने जाणून घेतली. जरी तो शिया मुस्लिम असला तरी तो अज्ञेयवादी प्रवृत्तीचा होता. त्याच्या कवितांमधून ग्रीक शहाणपण आणि इस्लामिक विचार यांचा मिलाफ आहे. बिरुनीच्या पुस्तकाचे अनुवादक सचाऊ यांचे असे म्हणणे की बिरुनीने "भारतावर सुमारे वीस पुस्तके, भाषांतरे आणि मूळ रचना, आणि अनेक कथा आणि दंतकथा लिहिल्या." त्याच्या तहकीक-ए-हिंद या पुस्तकात त्याने भारतीय तत्त्वज्ञानाची निःसंदिग्धपणे प्रशंसा केली. तो उपनिषद आणि भगवद्गीता यांनी विशेष प्रभावित झाला.
त्याचे पुस्तक 1017 ते 1030 दरम्यानच्या भारतातील त्याच्या अभ्यास आणि निरीक्षणांवर आधारित भारताच्या जीवनाचे सर्वेक्षण आहे. त्यानी भारतीय विचारांची तुलना सॉक्रेटिस, पायथागोरस, प्लेटो, ऍरिस्टोटल, गॅलेन आणि इतरांच्या ग्रीक विचारांशी आणि कधीकधी सुफी शिकवणीशी केली. त्याचे असेही म्हणणे होते की हिंदू त्यांचे कायदे सहजपणे रद्द करत असत, कारण हिंदूंच्या दृष्टीने असे बदल माणसाच्या स्वभावातील बदलामुळे आवश्यक आहेत. अनेक गोष्टी ज्या पूर्वी निषिद्ध होत्या त्याची आता परवानगी होती.
आता तुम्ही म्हणाल की हे मी काय चऱ्हाट लावलंय? मी पण तसाच भारताच्या गौरवशाली इतिहासात रमलो की काय? आणि जर इतक्या उच्च गोष्टी होत्या तर मग असे काय झाले की ज्यामुळे हा प्रदेश परकीय अंमलाखाली शेकडो वर्षे राहिला?
अहो जरा धीर धरा. बिरुनीने या बरोबरीने इतर ज्या गोष्टींची निरीक्षणे केली ती देखील बघूया.
हिंदूंची अपवित्र होण्याची संकल्पना आहे आणि गोष्ट एकदा का अपवित्र झाली की ती शुद्ध करून परत मिळवावी अशी त्यांची कधीही इच्छा नसते. इतर धर्मियांना त्यांच्या धर्माकडे झुकण्याची इच्छा असली तरीही, त्यांच्याशी संबंधित नसलेल्या कोणालाही स्वीकारण्याची परवानगी नाही. आता लक्षात येईल की क्षुल्लक कारणांवरून (विहिरीत पाव टाकणे वगैरे) धर्मांतर झालेले पुढे त्याच धर्मात का राहिले? कारण त्यांचा परतीचा मार्ग बंद होता.
संपूर्ण देश छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागला गेला होता आणि ही राज्ये एकमेकांविरोधात ईर्ष्येतून लढण्यात गुंतलेली होती. भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जवळपास नव्हतीच.
लोक मंदिरांना खूप दानधर्म करतात.
हिंदू समाज चार वर्ण आणि अंत्यज (अलुतेदार-बलुतेदार) - ज्यांना कोणत्याही जातीत गणले जात नाही अशा पारंपारिक विभाजनात विभागला गेला आहे आणि लोकांवर जातिव्यवस्थेचा प्रचंड पगडा आहे.
आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्याला देण्याची पद्धत ह्यांच्यात नाही. स्वजातीयानाच ज्ञान देण्याची पद्धत नसल्याने परकीयाचा तर विषयच नाही.
इतिहास सुसंगत लिहिण्याची पद्धत इथे रूढ नाही. जास्त काही विचारले तर कथा कल्पना रंगवून सांगतात.
हिंदूंना त्यांच्या देशाचा, त्यांच्या राजांचा, त्यांच्या धर्माचा आणि त्यांच्या शास्त्रांचा असलेला दुराभिमान असून ते अत्यंत "गर्विष्ठ, अहंकारी आणि दुराग्रही" आहेत. आपला देश, ज्ञान, धर्म सर्व जगात उच्च असून तसं इतर कोणाकडेही नाही, अशी त्यांची मानसिकता आहे.
बिरुनीने भारतीयांचं केलेलं वर्णन किती अचुक होत ह्याची प्रचिती आज हजार वर्ष उलटून गेल्यावरही येते.
गेल्या हजार वर्षात तुघलक, खिलजी, घोरी, लोदी, गुलाम, सुरी, मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच असे अनेक जण भारतावर राज्य करून गेले. परंतु हे कोण होते? कुठून आले? मुठभर असून इथे राज्य करण्यात यशस्वी का झाले? ह्याचा कधीही अभ्यास करण्याची गरज भारतीयांना पडली नाही कारण आमचा धर्म, ज्ञान, देश सगळ्यात भारी हा अहंकार कधीच कमी झाला नाही. आपलं ज्ञान दुसऱ्यांना न देण्याच्या वृत्तीतून कित्येक कलाप्रकार / तंत्रज्ञान काळाच्या ओघात नष्ट झाले.
ज्या धर्माच्या आधारावर त्यांनी इथे राज्य केले त्यांची मूलभूत माहितीही कोणाला ठेवाविशी वाटली नाही. मुसलमान आणि ख्रिश्चन राज्यकर्ते येऊनही कुणाला कधी कुराण, बायबलची पाने वाचून नेमकी त्यांची जडणघडण जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. ईस्ट इंडिया कंपनीने १५० वर्ष राज्य केलं तरी तिचं कामकाज, संस्थापक, संचालक मंडळ, रेकॉर्ड किपिंगच महत्व.. ह्याचा अभ्यास करावासा वाटला नाही.
जातीचा पगडा आजही समाजावर आहे हे आपल्याच राजकारणी मंडळींच्या भाषणबाजीतून दररोज ऐकायला आणि वाचायला मिळते.
मंदिरांना आजही मोठ्या प्रमाणावर दानधर्म होतो.
दुसऱ्या राज्याच्या नेत्याला आपल्या राज्यात पाय न ठेवू देण्याची भाषा आजही केली जाते.
"ग्यानवापी ! ग्यानवापी !" चा जयघोष चालू असताना आपल्याच आजूबाजूला हजारो मंदिरे आणि शिवकालीन गड-किल्ले धूळ खात भग्नावषेशात पडले आहेत ह्याची कोणालाच जाणीव नसणे ही भावनाच त्रासदायक आहे.
आपला ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीला कळणार कसा? सध्या प्री वेडिंग शूटचे पीक सर्वत्र दिसते आणि ते देखील अशा कुठल्यातरी धूळ खात पडलेल्या वास्तूच्या साक्षीने. बहुदा त्याच्याच पुण्याईने इतिहास कळावा अशी राज्यकर्त्यांची इच्छा असावी असे वाटते.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
प्रेरणा: सौरभ रत्नपारखी यांचा लेख