कोण होते वाकाटक? 

उत्तर हिंदुस्तानात कुशाणांच्या काळात बौद्ध आणि जैन धर्माचा प्रभाव होता. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत ८० टक्के लोक बौद्ध होते. मध्य आशियातून शक, क्षत्रप, कुशाण आले. त्यांच्यासोबत नाणीही आली. कुशाणांच्या काळात तांबे व सोन्याची नाणी प्रसिद्ध होती. समाज समृद्ध होता. हिंदू समाजाचे आणि त्यांच्या मूल्यांचं पुनरुत्थान हे नंतर गुप्त सम्राटांच्या रूपाने झाले. 
 
 
सम्राट अशोकाचे सर्व शिलालेख प्राकृतमध्ये आहेत. परंतु गिरनार आणि रुद्रदामनचे संस्कृतमध्ये आहेत. हे अचानक कसं घडलं? त्यावेळची सामाजिक स्थिती, राजे, सम्राट यांनी विविध धर्म, उपासनापद्धतींना उदारहस्ते दिलेला आश्रय आणि व्यापाराने आलेली समृद्धी यांचा निकटचा संबंध संस्कृतला महत्व प्राप्त होण्याला आहे. एका बाजूला वैदिक धर्मामध्ये बदल घडत होते, पुराणे घडत होती. तिसऱ्या शतकापर्यंत रामायण / महाभारत यांची रचना पूर्ण झाली होती. कुशाणांच्या नाण्यांवर बुद्धाबरोबर नंतर शिव व विष्णूही लोकप्रिय होऊ लागले. त्यातूनच नव्या प्रकारच्या हिंदू धर्माचे हुंकार दिसू लागले. 
 
 
या पार्श्वभूमीवर वाकाटकांचा उदय झालेला दिसतो. वाकाटकांचा कालखंड मनोरंजक आणि कुतूहलजन्य आहे. वाकाटकांचे राज्य पूर्वेस बंगालच्या उपसागरापासून ते पश्चिमेस अरबी समुद्रापर्यंत पसरलेले होते. परंतु या वाकाटक साम्राज्यविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. 
 
 
 
 
वाकाटक राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन सुमारे २५० ते ५२५ असा मनाला जातो. साम्राज्याचे संस्थापक विंध्यशक्ती काहीच माहिती उपलब्ध नाही. साम्राज्याचा विस्तार त्याचा पुत्र पहिला प्रवरसेन याच्या कारकीर्दीत घडला. त्याच्या पश्चात राजवंशाच्या चार शाखा झाल्या; त्यातील दोन शाखांची काहीही माहिती नाही. उर्वरित दोन शाखा म्हणजे नंदीवर्धन (आताचे नगरधन) आणि वत्सगुल्म (आताचे वाशीम) अशी दोन पाती यांची थोडीफार माहिती मिळते. 
 
 
महाकवी कालिदास महाराष्ट्रात आला आणि त्याने रामटेक येथे मेघदूत हे खंडकाव्य लिहिले एवढेच आपल्याला माहित असते. पण तो महाराष्ट्रात नक्की कशासाठी आला हे कोणालाच माहित नसते. गुप्त राजवंशाचा सम्राट सम्राट चंद्रगुप्त दुसरा (शकांचा नि:पात करणारा म्हणून ज्याला विक्रमादित्य अशी उपाधी प्राप्त झाली) याने त्याच्या नातवांना शिक्षण देण्यासाठी त्याला उज्जयिनीहून विदर्भाच्या जंगलात पाठवले होते. याचे ते नातू म्हणजेच वाकाटक राजवंशाचे नंतर झालेले राजे प्रवरसेन दुसरा, दिवाकरसेन आणि दामोदरसेन. त्यांची आई प्रभावतीगुप्ता ही विक्रमादित्याची कन्या होती. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या प्रवरसेन दुसरा याने नंतर सेतूबंध नावाचे काव्य लिहिले. 
 
 
वाकाटकांच्या राज्याच्या समृद्धीची कल्पना त्यांच्या काळात झालेल्या कलाविष्कारातून दिसून येते. पहिल्यांदा त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते ते आज जागतिक वारसा यादीत स्थान मिळविणारे अजिंठा. ज्यांच्या कालखंडात जगातील ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती साकारली गेली, त्यांची निदान काहीतरी माहिती आपल्याला असावी म्हणून हा लेखनप्रपंच. अजिंठा येथील बौद्ध गुंफांचा खरा आश्रयदाता म्हणजे वाकाटकांचा राजा हरिषेण. त्यांचा प्रधान अमात्य वहारदेव आणि मांडलिक राजा यांनी अजिंठ्याचे लेणे क्रमांक १६, १७ ते २१ पर्यंत लेणी खोदवून घेतल्या. 
 
 
 
 
मांडळ येथे १९७४-७६ च्या दरम्यान केलेल्या उत्खननामध्ये अंजिठ्याहूनही प्राचीन अशा वाकाटकांच्या कलाविष्काराचा, मूर्तींचा मोठा साठा आणि वाकाटकांचे तीन ताम्रपट सापडले. त्यातूनच पुढे रामटेक येथील सहा मंदिरे, ही याच राज्याच्या काळात बांधली गेली असावीत असे लक्षात आले. मणसर येथील प्रचंड शिवमंदिरही त्याच काळातील आहे असा शोध लागला. याच्यामुळे प्राथमिकरित्या अभिजात कलेच्या इतिहासाला वेगळेच वळण मिळाले. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील अजिंठा येथील कला आणि गुप्तांची मथुरा, प्रयाग आणि सारनाथ येथील बौद्ध कला यांच्यामधल्या दुव्याचा शोध लागला. 
 
 
अजिंठा येथील स्थापत्य शिल्प आणि चित्रकला हे बौद्ध कलेतील परमोच्च बिंदू आहेत. पण त्यानंतर मात्र बौद्ध कलेचा ऱ्हास झाला आणि तसेच बौद्ध धर्माचा आश्रय कमी होत गेला. 
 
 
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण होते हे वाकाटक? तर ते होते अस्सल महाराष्ट्रीय ब्राह्मण सम्राट. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 
प्रेरणा: डॉ अरविंद जामखेडकर यांचा लेख. 
 

Leave a commentGet more stuff

Subscribe to our mailing list and get interesting stuff and updates to your email inbox.

Recent Comments

history-cafe-b

Retelling History in an engaging language, featuring facts and thorough research.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

Contact Form

Subscribe

My Other Blogs: sarmisal.in

Copyright © 2020 HistoryCafe.

Made with ♡ by iTGS